गौराई देखाव्यात महिलांच्या बचत गटाची चमक

भिगवण प्रतिनिधी:
सध्या गणेशोत्सव, गौरी-गणपतीच्या सणानिमित्त विविध ठिकाणी आकर्षक देखावे साकारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी या गावात सौ. सोनाली मनोज कोंडे यांनी यंदा ‛महिला बचत गट’ या विषयावर साकारलेला गौरी देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या देखाव्यात पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या गौरी-गणपतींसोबत महिलांच्या बचत गटाचे महत्त्व ठळकपणे मांडले गेले आहे. महिलांची एकजूट, स्वयंरोजगार, छोटे उद्योग, तसेच आर्थिक सक्षमीकरणाचे संदेश या देखाव्यातून दिले गेले आहेत. विविध पदार्थ, हस्तकला, व्यवसायाशी निगडित वस्तू आणि महिलांच्या प्रगतीची झलक दाखवणारे साहित्य यात प्रदर्शित करण्यात आले आहे.

‛शिवप्रेमी महिला बचत गट तक्रारवाडी’यांच्या मार्फत समाजातील महिला वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी बचत गट किती महत्त्वाचे आहेत, याचे जिवंत चित्रण येथे पाहायला मिळाले. “सामूहिक बचतीतूनच सामूहिक प्रगती साधता येते” हा संदेश या देखाव्यातून अधोरेखित झाला.
तक्रारवाडी व आसपासच्या परिसरातील महिलांनी व स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.



