महाराष्ट्र ग्रामीण

दुबई साखर परिषद जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक – हर्षवर्धन पाटील.

-जगातील 70 देशाचा सहभाग


इंदापूर : प्रतिनिधी दि.11/2/25
जगातील साखर उद्योग हा एक महत्वाचा उद्योग मानला जात आहे. सध्या जगात प्रत्येक उद्योगांमध्ये स्थित्यंतरे येत असल्याने जागतिक साखर उद्योगापुढील संभाव्य समस्यांवर सखोल उहापोह या परिषदेत केला जाणार असून, त्यांचे निराकरण करण्यासंदर्भातही सामूहिक विचारमंथन होणार आहे. त्यामुळे दुबई साखर परिषद ही जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन भारताच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.11) केले.
दुबई येथे सोमवार दि.10 ते गुरुवार दि.13 फेब्रुवारी 2025 या कालावधीत जागतिक साखर उद्योगाची 9 वी दुबई साखर परिषद 2025 चालु झाली आहे. या दुबई साखर परिषदेमध्ये भारताच्या साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अंकिता पाटील ठाकरे, निहार ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच भारत सरकारचे सचिव दर्जाचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या शुगर परिषदेमध्ये जगातील सुमारे 70 देशातील साखर उद्योगाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, दुबई शुगर परिषदेमध्ये डिजिटल शेती, ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्वीकार, पाण्याच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक संकल्पना, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी भांडवल जमवणे, साखरेच्या आरोग्यासंदर्भातील चुकीच्या अफवा, तापमान वाढीची चिंता या संदर्भात चर्चा होणार आहेत. जागतिक तापमान हे 1 अंश पेक्षा अधिक सेल्सिअसने वाढलेले ​​आहे. सन 2024 हे वर्ष उच्चांकी उष्णतेचे ठरले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार जागतिक तापमान वाढ होत राहणार आहे. तसेच येऊ घातलेली संभाव्य मंदी, वातावरणातील बदल, डॉलरची ताकद आदि संदर्भातही चर्चा या परिषदेत होईल.
जगामध्ये प्रगत अर्थव्यवस्थांमधील आर्थिक आणि वित्तीय धोरणे जगाला मंदीकडे आणि दीर्घकाळापर्यंत स्तब्धतेकडे ढकलण्याचा धोका आहे, असे सध्या बोलले जात आहे. त्यामुळे 2008 मधील आर्थिक संकट आणि 2020 मधील कोविड-19 पेक्षा साखर उद्योगाचे अधिक नुकसान होऊ म्हणून सतर्कता बाळगणे संदर्भातील विषयावर या परिषदेत चर्चा होईल. साखर उद्योगातील तंत्रज्ञान, आधुनिकता, साखर व्यापार, साखर उद्योगा पुढील आव्हाने या संदर्भात जगातील साखर उद्योगातील तज्ञ या परिषदेत विचार मांडणार आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
——————————————-
दुबई साखर परिषदेमध्ये ‘ भारतासाठी आपण पुढे काय पाहणार आहोत?’ या विषयावरील चर्चासत्रात भारताच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व मान्यवर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारताचे साखर निर्यात धोरण, भारतामध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, या संदर्भातही यावेळी हर्षवर्धन पाटील मत मांडतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!