अंकलेश्वर देवाच्या यात्रेला उद्या पासून सुरुवात
यात्रे निमित्त मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन.

प्रतिनिधी :- विजय गायकवाड
अकोले– येथील ग्रामदैवत अंकलेश्वर देवाच्या यात्रेला चैत्र वद्य प्रतिपदा रविवार दि.१३(एप्रिल) उद्या पासून सुरुवात होत आहे. दोन दिवस होणाऱ्या यात्रेसाठी गावामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६ वाजता देवाचा अभिषेक आणि महापूजा झाल्यानंतर यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमामध्ये यात्रेनिमित्त दुपारी ४ वाजता निशाण काठयांची सुविद्य मिरवणूक होणार आहे. रात्री ८ वाजता ढोल-ताशांच्या गजरात गावातून देवाचा छबिना मिरवणूक निघणार आहे. यानिमित्त फटाक्यांची अतिशबाजीने यात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. मिरवणुकीच्या कार्यक्रमानंतर ग्रामस्थांच्या वतीने शेरणी वाटप व यात्रेनिमित्त आलेल्या लोकांसाठी रात्री १० वाजता नादखुळा ऑर्केस्ट्रा या मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.यात्रा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी मंगला बनसोडे यांच्या तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर दुपारी २ ते ४ वाजता कलगीवाले व तुरेवाले यांचा भेदीक सामना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांनतर दुपारी ४ वाजता नामांकित मल्लांच्या कुस्त्याचा आखाडा भरवण्यात येणार आहे.तसेच सोमवारी रात्री दहा वाजता मंगला बनसोडे यांचा तमाशाचा कार्यक्रम होणार असून त्यांनतर यात्रेची सांगता होणार आहे. खास अकोले येथील यात्रेसाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्यने येत असतात.यावेळी यात्रेच्या निमित्ताने अंकलेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
अकोले (इंदापूर) येथील अंकलेश्वर देवाचे मंदिर.