अकोले परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतीचे व पिकांचे मोठे नुकसान.

अकोले प्रतिनिधी :
परिसरात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले आहे. परिसरातील काझड, लाकडी, निंबोडी, वायसेवाडी ,धायगुडेवाडी, येथील शेती क्षेत्राचे माती वाहून गेल्याने व विहिरी बुजून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.


रविवारी रात्री अतिप्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस रात्रभर सुरू होता यामुळे या भागतील ओढे नाले कॅनॉल पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. या परिसरातील लोकांचे दळणवळणाचे रस्ते पाण्याखाली गेल्याने मोठी गैरसोय झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.

शेतात मका, ऊस, बाजरी मुसळधार पावसाने वाहून गेल्याचे बऱ्याच शेतात बघायला मिळत आहे.ओढ्या नाल्याच्या बाजूला असणाऱ्या शेतातील माती पूर्णपणे वाहून गेली आहे.अनेक वाडया वस्तीवरील रस्ते पाण्याने जलमय झाल्याने लोकांचा गावात येण्याचा संपर्क तुटला आहे. पाटील वस्तीवरील तळ्यातून पाणी वाहिल्याने शेतातील मातीने विहिरी पूर्णपणे बुजून गेल्याचे पाहायला मिळत आहे.या झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाल्याने शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.




