महाराष्ट्र ग्रामीण

नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील.

उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड.

इंदापूर : प्रतिनिधी

शहाजीनगर (ता.इंदापूर) येथिल नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सौं.भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड सोमवारी (दि.28) करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी दादासाहेब उत्तम घोगरे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.


निरा भीमा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. राज्यामध्ये सलग पाचव्यांदा पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होणारा निरा भिमा हा एकमेव कारखाना आहे. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर शहाजी सभागृहामध्ये संचालक मंडळाची बैठक उपजिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अध्यक्षपदासाठी भाग्यश्री पाटील व उपाध्यक्षपदासाठी दादासाहेब घोगरे या दोघांचे अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी केली.
नूतन अध्यक्षा भाग्यश्री पाटील ह्या निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका म्हणून गेली 20 वर्षे काम करीत आहेत. तसेच त्या अनेक सहकारी संस्थांवर संचालिका म्हणून काम पाहत आहेत. त्याचप्रमाणे भाग्यश्री पाटील यांचा इंदापूर तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमात गेली 3 दशके सक्रिय सहभाग राहीला आहे.
या निवडीनंतर कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नूतन अध्यक्षा भाग्यश्री पाटील व उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना हर्षवर्धन पाटील यांनी मावळते अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी 10 वर्षे उत्कृष्ठ काम केले तसेच आजपर्यंतचे उपाध्यक्ष, आजपर्यंतचे संचालक मंडळ यांचे आभारही व्यक्त केले. तसेच यावेळी नूतन अध्यक्षा भाग्यश्री पाटील व उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या. या बैठकीस कारखान्याचे संस्थापक संचालक हर्षवर्धन पाटील, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी देवकर, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे हे संचालक उपस्थित होते. आभार कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी मानले.

निरा भिमाचा भविष्यकाळ उज्वल- हर्षवर्धन पाटील.

नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, जी व्यक्ती कारखान्याचे रोपटे लावते, वाढविते व ते मोठे करताना किती त्रास व अडचणी असतात हे रोपटे लावणाऱ्यास माहिती असते. नीरा भीमाच्या सन 1998 च्या स्थापनेपासून गेली 26 वर्षे झाले कारखान्यावरती शेतकरी सभासदांचा मोठा विश्वास कायम आहे. या विश्वासाच्या शिदोरीवरच कारखान्याने आज पर्यंतच्या प्रगतीचा मोठा टप्पा गाठलेला आहे. गत हंगामातील उर्वरित शेतकऱ्यांचे पेमेंट येत्या काही दिवसात अदा केले जाईल. आगामी काळात सर्वांनी एकत्रितपणे व जबाबदारीने कारखान्याचे कामकाज करावे. आगामी 5 वर्षांमध्ये कारखान्याची स्थिती कठोर निर्णय व नियोजन करून पूर्वपदावर आणावयाची आहे. नीरा भीमा कारखान्याचा आगामी काळ निश्चितपणे उज्वलच राहणार आहे. तसेच कारखान्याचा समावेश आगामी काळात राज्यातील नामांकित कारखान्यांमध्ये होईल, असे आपले ध्येय आहे. कारखान्याचा आगामी गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने यशस्वी होईल, त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असेही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!