जगद्गुरू थोर संत तुकोबारायांची हुबेहुब अप्रतिम अशी रांगोळी
सौ. निकिता ताई गोलांडे यांची अप्रतिम कला.

प्रतिनिधी :- रणजित सावंत.
रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. जेवणाच्या ताटाभोवतीही रांगोळी काढतात. दिवाळी सण, शुभ उत्सव, विवाह, उत्सव, मेळावे यासारख्या प्रसंगांमध्ये आणि भारतीय उपखंडातील हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगोळी हमखास काढतात. रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात.
रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे हे आहे. परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णनदेखील भिन्न असू शकते. हे पारंपरिकपणे मुली किंवा महिलांनी केले आहे. साधारणता,
रांगोळी डिझाईनमध्ये साधे भूमितीय आकार, देवतांचे प्रभाव किंवा फुलांचे आणि पाकळ्याचे आकार (दिलेल्या उत्सवासाठी योग्य) असू शकतात, परंतु असंख्य लोकांकडून तयार केलेल्या त्यांत खूप विस्तृत डिझाइन्स देखील असू शकतात. सामान्यत: कोरडे किंवा ओले रांगोळीच्या दगडाचे चूर्ण, तांदळाचे पीठ किंवा अन्य कोरडे पीठ असते. रांगोळीत शेंदूर, हळद, कुंकू आणि इतर नैसर्गिक रंग जोडले जातात. इतर सामग्रीमध्ये लाल विटांची पावडर आणि फुले व त्यांच्या पाकळ्या समाविष्ट असतात.
संत साहित्य मध्ये देखील आपल्याला रांगोळीचे महत्त्व पाहायला मिळते,
इ. स. १२७८ च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये “…. तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :… ” असा उल्लेख येतो. खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांच्या मतानुसार यातील ‘”‘रंगमाळीका” हा उल्लेख रांगोळी बद्दल असू शकतो.[२५]
संत जनाबाई यांच्या ‘विठोबा चला मंदिरांत’ या अभंगात ‘ रांगोळी घातली गुलालाची ‘, असा उल्लेख येतो.[२६]
संत एकनाथांच्या गाथेत अंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळ्यांचे पुढीलप्रमाणे वर्णन .
रामकृष्ण आले ऐकोनी । उताविळ झाल्या गौळणी ।
रांगोळ्या नानापरी आंगणीं । घालिताती सप्रेमें ॥७८॥
असे पुराण काळापासून रांगोळीचे अनन्य साधारण असे महत्त्व चालत आलेले आहे.
अशीच सुंदर रांगोळी आज एकादशीचे निम्मित साधत जगद्गुरू थोर संत तुकोबारायांची हुबेहुब अप्रतिम अशी रांगोळी विठ्ठल मंदिरात श्री दत्त पीठ दत्त मंदिराच्या सेवेकरी सौ निकिता ताई गोलांडे यांनी काढली. एकीकडे कीर्तन सेवा सुरू असताना सर्व वैष्णव कीर्तनात मग्न झालेले, दुसरीकडे निकिता ताई त्या अभंगाच्या लयीत आपली रांगोळी पूर्ण करत आहेत, हे विलोभनीय दृश्य मनाला स्पर्शून जाणारे आहे. ह्या अगोदरही अनेक वेळा सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमात रांगोळी काढून त्यांनी आपली कला सादर केली आहे. आज एकादशीनिमित्त रांगोळी काढण्याचा योग आला. आपले घर संसार सांभाळून त्या ही कला जोपासतात ही अभिमानास्पद बाब आहे, त्यांच्या या कलेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. त्यांच्या या रांगोळी काढण्याच्या कलेचा सर्व स्तरातून गौरव होत आहे व कौतुकांचा वर्षाव देखील होत आहे .