भिगवण गावच्या सरपंचपदी श्री गुराप्पा पवार यांची निवड ;
- कुंची कोरवी समाजातील महाराष्ट्रातील पहिला सरपंच होण्याचा मिळाला मान.

भिगवण इंदापूर तालुक्यातील भिगवण ग्रामपंचायती मध्ये कुंची कोरवी समाजाचा महाराष्ट्रातील पहिला सरपंच होण्याचा मान गुरप्पा पवार यांनी मिळविला. आजची निवडणूक जवळजवळ बिनविरोध होणार हे निश्चित असताना सरपंच पदासाठी श्रीमती निर्मला हरिचंद्र पांढरे यांचा दुसरा अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक घेण्यात आली. गुप्त पद्धतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी गुराप्पा गंगाराम पवार यांना १२ मते मिळाली. तर श्रीमती निर्मला हरिचंद्र पांढरे यांना ५ मते मिळाली. भिगवण गावच्या सरपंचपदी गुराप्पा गंगाराम पवार यांची निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी दीपक कोकरे यांनी दिली. निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून दिपक कोकरे तसेच तलाठी राहुल देवकर यांनी कामकाज पाहिले.
भिगवण मधील सद्य सत्तेतील गटाकडे एकूण १६ मते व विरोधातील गटाकडे एकच मत असतानाही ५ सदस्यांनी आपली मते विरोधात दिल्याने आश्यर्य व्यक्त केले जात आहे. तसेच फुटलेली मते कोणाची याची चर्चा सुरू आहे ही मते नक्की कोणाची नाराज झालेल्या सदस्यांची की पदे मिळूनही सत्तेत राहीलेल्यांची याबाबत देखील दबकी चर्चा सुरु झाली आहे. मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीने पार पडल्यामुळे अशी नावे समजणे शक्य होणार नसले तरी भिगवण करांमध्ये चर्चांना उधाण आले आहे .
या निवडीनंतर जयदीप जाधव , अशोकभाऊ शिंदे यांनी नवनिर्वाचित सरपंच यांना शुभेच्छा दिल्या व सरपंच गुराप्पा पवार यांनी आभार व्यक्त केले.