
सोलापूर प्रतिनिधी :–
उजनी बॅकवॉटरमुळे तीनही बाजूंनी वेढलेल्या कुगाव (ता. करमाळा) गावाला इंदापूर शहरासोबत जोडणारा ‘विकासाचा सेतू’ शेवटी साकारतोय. फक्त ९ किमीचे हवाई अंतर पण प्रवासासाठी लागणारे १०० किमीचे अंतर पार करणारा हा पूल आता प्रगतीपथावर आहे.
कुगाव गाव हे नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असले तरी उजनी बॅकवॉटरमुळे ते इतर भागांपासून तुटलेले होते. इंदापूर फक्त नऊ किलोमीटर अंतरावर असूनही, गावकऱ्यांना शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ आणि इतर मूलभूत सुविधांसाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागत असे. हा केवळ अंतराचा प्रश्न नव्हता, तर संधी आणि विकासाच्या मार्गातील एक प्रचंड अडथळा होता.
या समस्येचा कायमस्वरूपी उपाय म्हणजे कुगावला इंदापूरशी जोडणारा पूल. यासाठी स्थानिक नेते आणि जनप्रतिनिधींनी दीर्घकाळ आंदोलन केले होते. कुगावच्या माजी सरपंच सौ. तेजस्विनी दयानंद कोकरे यांनी या पुलासाठी शासन दरबारी मागणी करून पाठपुरावा सुरू केला. मात्र, या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने वेग दिला तो माजी आमदार आणि तत्कालीन पालकमंत्री मा. ना. दत्तात्रय मामा भरणे यांनी.
या संपूर्ण प्रयत्नांना निर्णायक वळण मिळाले ते मा. ना. अजितदादा पवार यांच्या प्रयत्नांमुळे. अजितदादा पवार यांनी विधानसभेत या पुलाच्या बांधकामासाठी ठोस पाऊल उचलले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पुलासाठी ३९६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आणि शासनाने या प्रकल्पाला अधिकृत मंजुरी दिली.
शासनाच्या मंजुरीनंतर समन्वय साधून, महाराष्ट्र शासनामार्फत २३ ऑगस्ट २०२४ रोजी या पुलाच्या बांधकामाची सुरुवात करण्यात आली. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पुलाच्या पूर्ण होण्याने कुगाव आणि आजूबाजूच्या अनेक गावांच्या लोकांचे जीवन सुसह्य होणार आहे. शेतीचे व्यवहार सोपे होणार, आरोग्यसेवा आणि शिक्षणासाठी प्रवास सुलभ होणार आणि संपूर्ण प्रदेशाचा आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.
हे पूल केवळ इंदापूर आणि कुगावला जोडणार नाही, तर संपूर्ण प्रदेशाला विकासाच्या नवीन मार्गावर नेणारा ‘सेतू’ ठरेल.

