महाराष्ट्र ग्रामीण

प्रियांका-निकला सोडावं लागलं तब्बल 20 दशलक्ष डॉलर्सचं स्वप्नांचं घर; काय आहे कारण?

मुंबई | बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे 2019 पासून लॉस एंजिलिसमधल्या ज्या स्वप्नांच्या घरात राहत होते, त्यातून अखेर बाहेर पडले आहेत. ‘पेज सिक्स’ने दिलेल्या वृत्तानुसार प्रियांका-निकचं हे घरं आता राहण्यालायक राहिलेलं नाही. घरात ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने दोघांनी या घरात न राहण्याचं ठरवलं आहे. इतकंच नव्हे तर ते सध्या घराच्या विक्रेत्याविरोधात कायदेशीर लढाई लढत आहेत. मालमत्तेला झालेल्या नुकसानीमुळे आता त्या घरात राहणं आरोग्याच्या दृष्टीकोनातून धोकादायक बनल्याचं कळतंय.

लॉस एंजिलिसमध्ये प्रियांका आणि निकचं अत्यंत आलिशान घर आहे. सात बेडरुम्स, नऊ बाथरुम्स, तापमान नियंत्रित ठेवणारं वाइन सेलर, शेफचं किचन, होम थिएटर, बोलिंग ॲली, स्पा आणि स्टीम शॉवर, जिम आणि बिलियर्ड्स रुम.. अशा सर्व सुविधा या आलिशान घरात आहेत. 2019 मध्ये प्रियांका-निकने हे घर तब्बल 20 दशलक्ष डॉलर्सना विकत घेतलं होतं. प्रियांका-निकने मे 2023 मध्ये या घराच्या विक्रेत्याविरोधात खटला दाखल केला आहे. कारण घर खरेदी केल्यापासूनच स्विमिंग पूल आणि स्पा भागात विविध समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या, असा आरोप त्यांनी केला आहे. आवारातील वॉटरप्रूफिंग समस्यांमुळे बुरशी तयार होणे आणि त्यासंबंधीच्या विविध समस्या निर्माण झाल्या. त्याच वेळी डेकवरील बार्बेक्यू परिसरातसुद्धा पाण्याची गळती होऊ लागली, असंही त्यांनी तक्रारीत म्हटलंय.

घरातील दुरुस्तीसाठी आलेला सर्व खर्च आणि त्याचप्रमाणे इतर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी प्रियांका-निकने केली आहे. ‘पेज सिक्स’च्या रिपोर्ट्सनुसार, मालमत्तेच्या दुरुस्तीचा खर्च हा 1.5 दशलक्ष डॉलर्सपासून 2.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 13 ते 20 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. दरम्यान प्रियांका आणि निक हे त्यांची मुलगी मालती मेरीसह दुसरीकडे राहायला गेले आहेत. लॉस एंजिलिसमधील घराच्या दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत ते दुसरीकडे राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!