महाराष्ट्र ग्रामीण

अडवाणी यांना ‘त्या’ आरोपातून मुक्त केले का?; प्रकाश आंबेडकर यांचा भाजपला सवाल

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे नगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. लालकृष्ण अडवाणी यांनी जीनांच्या कबरीवर फुले वाहिली होती. त्यामुळे तुम्ही अडवाणींना पक्षातून बेदखल केलं होतं. आता अडवाणी यांना भारतरत्न देऊन त्यांना त्या आरोपातून मुक्त केलंय का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

 नगर : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. अडवाणी यांना पुरस्कार जाहीर होताच त्यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे. मात्र, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर टीका केली आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जीना यांच्या कबरीवर फुले वाहिली. तुम्ही त्यांना पक्षातून काढून टाकले. त्या आरोपातून तुम्ही अडवाणी यांना आता दोषमुक्त केलं आहे का?, असा सवाल करतानाच अडवाणी यांना पुरस्कार देणं हा भाजपचा फार्स आहे, अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर आज नगरमध्ये आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही टीका केली. आंबेडकर यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. मला ज्या ज्या ओबीसी महासंघाने बोलावलं त्याच्या सभेला मी गेलो. मराठा समाज आणि ओबीसींमध्ये तेढ निर्माण होणार नाही या दृष्टीकोनातून माझा प्रयत्न असेल. काही ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक तेढ निर्माण करायची आहे. गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्ता द्यावी, आम्ही तोडगा देतो. त्या तोडग्यात ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असेल आणि मराठा समाजाचे आरक्षणाचा ताट वेगळं असेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आमदार राजे झालेत

आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदारांनी स्वत:ला राजे समजू नये. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. राजे नाहीत. पण सध्या आमदार राजे झाले आहेत. ते पाहिजे तसं सरकारला झुकवतात. सकाळी गृहमंत्री भेटले. मात्र ते म्हणाले आदेश दिला आहे. तो आदेश कोणाला दिला मला माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

आधी चर्चा, मग जागा वाटप

महाविकास आघाडीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काही प्रश्न आहेत. ते महत्त्वाचे प्रश्न आहेत. शेती, जाती आरक्षण असे आणि इतर प्रश्न त्या बाबत काय अजेंडा आहे याविषयी मी इंडिया आघाडी बरोबर चर्चा केली. आम्ही 25 मुद्द्यांची लिस्ट त्यांना दिली आहे. त्यावर चर्चा होईल. त्यानंतर आम्ही जागा वाटपावर चर्चा करू, असंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!