India’s Got Latent कायद्याच्या कचाट्यात; रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यानंतर वातावरण तापलं, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

India’s Got Latent Controversy: स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोवरून सध्या गोंधळ सुरू आहे. याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
India’s Got Latent Controversy: समय रैनाच्या (Samay raina) ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (India’s Got Latent) या शोच्या एका नव्या एपिसोडवरुन वाद पेटला आहे. या शोमध्ये गेस्ट म्हणून आलेला युट्युबर रणवीर अलाहाबादियानं आई-वडिलांबाबात आक्षेपार्ह्य वक्तव्य केल्यानंतर वादाला तोंड फुटलं आहे. सोशल मीडियावर या शोसोबतच रणवीर अलाहाबादियावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. रणवीरनं या शोमध्ये बोलताना आई-वडिलांबाबत अश्लील टीप्पणी केली. त्याच्या याच वक्तव्याबाबत लोकांनी राग आणि नाराजी व्यक्त केली आहे. आता आई-वडिलांबाबतच्या आक्षेपार्ह्य वक्तव्यामुळे ‘इंडियाज गॉट लेटेंट’, समय रैना आणि स्वतः रणवीर अलाहाबादियाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. तसेच, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रणवीरच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करत कारवाई करण्याबाबत वक्तव्य केलं आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यावर काय म्हणाले?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शोबद्दल सांगितलं की, मला याबद्दल माहिती मिळाली आहे. जरी मी त्याला अजून पाहिलेलं नाही. मला कळलं आहे की, गोष्टी अश्लील पद्धतीनं चालवल्या जात आहेत, जे पूर्णपणे चुकीचं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना आहे, पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करतो, तेव्हा आपलं स्वातंत्र्य संपतं. हे बरोबर नाही. प्रत्येकाच्या मर्यादा असतात, आम्ही अश्लीलतेसाठीही नियम ठरवले आहेत. जर कोणी त्या मर्यादा ओलांडल्या किंवा नियम मोडले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
‘इंडियाज गॉट लेटेंट’ कायद्याच्या कचाट्यात
स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोवरून सध्या गोंधळ सुरू आहे. अलीकडेच या शोचा एक नवा भाग आला, ज्यामध्ये रणवीर अलाहाबादिया, आशिष चंचलानी आणि अपूर्वा मुखिजा गेस्ट म्हणून उपस्थित होते. यादरम्यान रणवीर अलाहाबादियानं आई-वडिलांबाबत अत्यंत खालच्या स्तरावर जात, अश्लील टिप्पणी केली. त्याच्या या वक्तव्यानंतर लोक संतापले आहेत. दरम्यान, समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तसेच, यापूर्वीही या शोविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशातच आता रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यानंतर ‘इंडियाज गॉट लेटेंट’ कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. हिंदू आयटी सेलने या शोविरुद्ध तक्रार दाखल केली.
मुंबई आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल
या प्रकरणाबाबत, युट्यूबर रणवीर अलाहाबादिया, कॉमेडियन समय रैना आणि इंडियाज गॉट लेटेंट शोच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत मुंबई आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि पत्रात आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये विचारले जाणारे वल्गर प्रश्न, वांशिक टिप्पण्या आणि अश्लील वक्तव्यांवरून सोशल मीडियावर गदारोळ सुरू आहे. अशा परिस्थितीत, हिंदू आयटी सेलनं अधिकृत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कारवाई करण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकरण नेमकं काय?
अलीकडेच, YouTuber आशिष चंचलानी, कंटेंट क्रिएटर अपूर्व मुखिजा आणि रणवीर अल्लाहबादिया हे समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये दिसले. यादरम्यान रणवीरनं एका स्पर्धकाला विचारलं की, “तुला तुझ्या आई-वडिलांना आयुष्यभर इंटिमेट होताना पाहायचं आहे की, एकदा ते इंटिमेट होताना त्यांच्यासोबत सामील व्हायला आवडेल?” रणवीरचं हे वक्तव्य लोकांना अजिबात आवडलं नाही आणि सोशल मीडियावर एकच गदारोळ झाला. नेटकऱ्यांकडून रणवीरवर टिकेची झोड उठवली जात आहे. शो दरम्यान अनेक वाईट गोष्टी बोलल्या गेल्या, ज्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत आणि त्यामुळे गोंधळ उडाला आहे.