महाराष्ट्र ग्रामीण

सीबीआयची मोठी कारवाई, ‘मातोश्री’च्या जवळच्या नेत्याच्या पीएवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरु आहे. यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार रवींद्र वायकर, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण, आमदार राजन साळवी यांच्यासह आणखी काही जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत आता आणखी एकाचा समावेश झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे नेते खासदार अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटे यांच्याविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीकडूनही या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, अशी चर्चा आता सुरु आहे. त्यामुळे दिनेश बोभाटे यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या तपासाचे धागेदोरे अनिल देसाई यांच्यापर्यंत तर पोहोचणार नाही ना? अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या पीएवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपाखाली दिनेश बोभाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयचा दिनेश बोभाटे यांच्याविरोधात मिळकतीपेक्षा 36 टक्के बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप आहे. दिनेश बोभाटे एका इन्शुरन्स कंपनीमध्ये सिनियर असिस्टंट म्हणून कार्यरत होते. यावेळी त्यांनी बेहिशोबी मालमत्ता कमावल्याचा आरोप सीबीआयकडून करण्यात आला आहे.

2 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम बेहिशोबी कमवल्याचा आरोप

सीबीआयने दिनेश बोभाटे यांच्याविरोधात 17 जानेवारीला मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला आहे. बोभाटे 2013 ते 2023 च्या कालावधीत एका इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट म्हणून कार्यरत होते. यादरम्यान त्यांनी संबंधित इन्शुरन्स कंपनीत टप्प्याटप्प्याने जवळपास 36 टक्के बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. सीबीआयने या प्रकरणी दिनेश बोभाटे आणि त्यांच्या पत्नी देवश्री बोभाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्याने जवळपास 2 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम बेहिशोबी कमवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. त्यामुळे दिनेश बोभाटे आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयकडून येत्या काळात दिनेश बोभाटे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सीबीआयच्या या गुन्ह्याच्या आधारावर कदाचित ईडीकडूनही मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे दिनेश बोभाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिनेश बोभाटे हे अनिल देसाई यांचे स्वीय सहाय्यक असल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!