महाराष्ट्र ग्रामीण

महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही? ‘वंचित’ची आता पुढची रणनीती काय? प्रकाश आंबेडकर म्हणाले….

मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात सध्या बोलणी सुरु आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्र सामोरं जाण्याबाबत निर्णय घेण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार महाविकास आघाडीसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण महाविकास आाडीत प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याबाबतचा अंतिम अधिकृत असा निर्णय होत नव्हता. अखेर महाविकास आघाडीच्या काल झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकाश आंबेडकर यांना तसं महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून पत्रही पाठवण्यात आलं आहे.

या पत्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची स्वाक्षरी आहे. पण नाना पटोले यांच्या स्वाक्षरीवर प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. “नाना पटोलेंना कुणाला सहभागी करुन घेण्याचा अधिकार आहे का ते आम्हाला माहिती नाही. आमच्या माहितीनुसार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे महत्त्वाचे नेते आहेत. त्या दौघांपैकी कुणाचीही स्वाक्षरी पत्रावर नाही. त्यामुळे काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावं”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

“महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला चर्चेसाठी येण्याचं निमंत्रण आलं होतं. आम्ही त्या बैठकीत गेलो, त्या बैठकीत आम्ही आधी विचारलं की, तुम्ही काही अजेंडा तयार केला आहे का? तर त्यावर त्यांच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. त्यामुळे आम्ही आमचा जो अजेंडा होता तो समोर ठेवला. पहिला अजेंडा म्हणजे ओबीसींची जी मागणी आहे की, आम्ही कुणालाही आपल्या आरक्षणात सहभागी करुन घेणार नाही, ती एक समस्या आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे जरांगे पाटील लढत आहेत त्यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तिसरा अजेंडा म्हणजे दिल्लीत शेतकऱ्यांनी काळ्या कायद्यांविरोधात आंदोलन केलं होतं तसं 2006 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी मिळून प्रायव्हेट मार्केटचा कायदा आधीच बनवलं आहे. या मागणीला पाहता प्रत्येक पक्षाची एक भूमिका असली पाहिजे, असं मत आम्ही मांडलं आहे”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

‘महाविकास आघाडीत फूट पडू नये’

“दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एकत्र आलो तर 31 मुद्द्यांवर कॉमन मिनिमम प्रोग्रॅम होऊ शकतं. याबाबतची चर्चा सकारात्मक झाली तर पुढे जाणं योग्य ठरेल. नाहीतर ज्याप्रकारे इंडिया आघाडीत फूट पडली आहे तशी फूट महाविकास आघाडीत पडू नये, अशी चिंता आम्हाला आहे, अशी भूमिका आम्ही जाहीर केली आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

‘आम्ही कुठलाही पर्सनल इगो आड येऊ देणार नाही’

“जागावाटपाचा प्रश्न आहे, आमचं असं म्हणणं आहे की, तुम्ही तीनही पक्ष अडीच वर्षांपासून सोबत आहात. त्यामुळे तुमचं जागावाटपाबाबत ठरलं असेल. आपला त्याबाबत काय निर्णय घेतला आहे त्याची माहिती आम्हाला आज द्यावी किंवा पुढच्या बैठकीत द्यावी, जेणेकरुन आम्हाला त्याबाबतची भूमिका घेता येईल. आम्ही अपेक्षा करतोय की, 2 फेब्रुवारीच्या बैठकीत जो अजेंडा दिला आहे, तो आणि तीन घटक पक्षांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला तयार होईल, असं मी मानतो. त्याचा मसुदा त्यांनी आम्हाला दिला की मग आम्ही कलेक्टिवली बार्गनिंग करु. आम्ही वैयक्ति एक-एक पक्षाचं बोलायचं, बैठकीत निर्णय होईल. आम्ही बैठकीत खुलासा केला की, केंद्रातलं भाजप सरकार पुन्हा येणार नाही या दक्षतेसाठी आम्ही कुठलाही पर्सनल इगो किंवा इतर काहीही आड येउ देणार नाही, अशी भूमिका तयार केली आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!