रोहित पवारांच्या समर्थनार्थ सोलापुरात राष्ट्रवादीची निदर्शने
सोलापूर : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांना केंद्रीय सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले असताना सरकारच्या तपास यंत्रणांच्या वाढत्या दुरूपयोगाबद्दल संताप व्यक्त करीत, रोहित पवार यांच्या समर्थनासाठी सोलापुरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने निदर्शने केली.
चार हुतात्मा पुतळ्यांसमोर दुपारी झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष निशांत सावळे आणि पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी केले. आमदार रोहित पवार यांनी नागपूर विधिमंडळ अधिवेशन काळात युवकांच्या बेरोजगारीसह महागाईच्या मुद्यावर काढलेल्या युवा संघर्ष यात्रेमुळे मोदी सरकारने केवळ आकसापोटी आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी चौकशीच्या रूपाने दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यास रोहित पवार व त्यांचे कुटुंबीय बळी पडणार नाहीत, असे निशांत सावळे यांनी सांगितले. या आंदोलनात माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दिनेश शिंदे, पक्षाच्या महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे, पक्षाचे शहर सरचिटणीस चंद्रकांत पवार, शहर युवक अध्यक्ष अक्षय वाक्षे, कार्याध्यक्ष सरफराज शेख, प्रतीक्षा चव्हाण, जावेद शिकलकर, नुरुद्दीन मुल्ला, लक्ष्मण भोसले, विजय भोईटे अक्षय जाधव आदींचा सहभाग होता.