सभेत घुसून कानाखाली मारू, रविकांत तुपकर यांना आमदार रायमुलकर यांची मारण्याची धमकी; जाहीर धमकीने खळबळ
बुलढाणा | लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे. तसतसे राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जाहीर भाषणातून चक्क मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. मेहकर तालुक्यातील उकळी- सुकळी या गावात झालेल्या एका कार्यक्रमात बोलतांना आमदार रायमुलकर यांचा स्वतःवरील ताबा सुटल्याचे यावेळी दिसून आले. रविकांत तुपकरांच्या सभेत घुसून त्यांच्या कानाखाली मारू, अशी धमकीच रायमूलकर यांनी दिली. यावेळी त्यांनी रविकांत तुपकर यांच्या वकील असलेल्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांच्यावरही आमदार रायमुलकरांनी वादग्रस्त टिप्पणी केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांच्या सभा तसेच राजकीय दौरेही सुरू झाले आहेत. या सभा आणि त्यातील होणाऱ्या आरोपप्रत्यारोपांनी जिल्ह्याजिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे देखील लोकआग्रहास्तव लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या जोरदार तयारीत आहेत. रविकांत तुपकर हे सध्या जिल्हाभरात ‘एल्गार परिवर्तन मेळावे’ घेत असून गावोगावी शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्याकडून लोकसभा लढवण्यासाठी मोठा निधी देखील उभा करत आहेत.
तुपकरांचा तोल गेला
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी मेहकर तालुक्यातील उकळी-सुकळी येथे ‘एल्गार परिवर्तन मेळाव्या’चं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्याच ठिकाणी 24 जानेवारी रोजी शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांचीही सभा पार पडली. यावेळी रविकांत तुपकरांवर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. या सभेत रायमुलकर यांचा तोलच ढासळला. त्यांनी थेट तुपकरांना मारण्याची धमकीच दिली आहे. तर खासदार जाधव यांनीही तुपकर यांचा समाचार घेतला आहे. या धमकीचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने थेट आमदारानेच शेतकरी नेत्याला धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.
रायमुलकर साहेब…
या धमकी प्रकरणानंतर रविकांत तुपकर यांनीही संजय रायमुलकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोकांनी परिवावर्तन करायचे ठरविले. त्यामुळे आमच्या सभाना प्रचंड गर्दी होते. ते बावचळल्यासारखे वागत आहेत. खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे त्यांना शोभते का? आम्ही पण त्यांना जशास तसे उत्तर देऊ शकतो . रायमुलकर साहेब, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी हे लक्षात ठेवा, असा सूचक इशाराही तुपकर यांनी दिला.
पांचट धमक्यांना घाबरत नाही
रायमुलकर साहेब, तुमच्या पांचट धमक्यांना आम्ही घाबरत नाहीय. त्यांना धमक्या देण्याची नेहमीच सवय आहे. त्यांनी बोलताना तोल सांभाळावा. शेतकऱ्यांसाठी प्रश्न विचारणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. असल्या दादागिरींना आम्ही घाबरत नाही, असं तुपकर यांनी म्हटलं आहे.