महाराष्ट्र ग्रामीण

‘वंचित’चा महाविकास आघाडीत समावेश झालेलाच नाही? प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलं. महाविकास आघाडीची काल बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर आज प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली. “वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी केल्याच्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची स्वाक्षरी आहे. पण याबाबत आमची काँग्रेसच्या प्रभारींसोबत बातचित झाली होती. त्यामुळे आम्हाला संशय आहे की, नाना पटोले यांना महाविकास आघाडीत कुणाला सहभागी करुन घेण्याचा अधिकार दिला आहे की नाही, याबाबतची स्पष्टता आम्ही काँग्रेस पक्षाकडून मागत आहोत. नाहीतर नाना पटोले एक करायला जाणार आणि काँग्रेसला दुसरं काही करायचं असेल तर पुढे गडबड होऊ शकते. त्यामुळे याबाबतचा खुलासा आम्ही काँग्रेस पक्षाकडून मागत आहोत”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला की नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अजून मानायचं नाही, असं स्पष्ट केलं. “वंचित बहुजन आघाडीला यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने त्याला मान्यता दिली पाहिजे. एआयसीसीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला माहिती नाही. नाना पटोले फक्त पत्रव्यवहार करतात, पण आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण नेते आहेत. ते निर्णय घेतील. त्या पत्रावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची सही नाही”, असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिलं.

‘आम्ही इशू करणार नाहीत’

वंचितला अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावा केला जात होता, तरीही तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार? असा प्रश्न पत्रकारांनी प्रकाश आंबेडकर यांना विचारला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “आम्ही आधीच म्हणालो आहोत की, वागणूक कशी मिळाली याचा आम्ही इगो करणार नाहीत. आम्ही इशू करणार नाहीत. आम्ही अगोदरपासून म्हणतोय की, हे भाजपचं शासन अगोदरपासून धोकादायक आहे. म्हणून आम्ही त्यांचा विरोध करतोय. जेव्हा आपला इगो भाजप-आरएसएसचं सरकार न येणं याच्या प्रारब्धी पाहिलं असलं तर आरएसएस-भाजपचं सरकार न येणं याला आम्ही प्राधान्य देत आहोत”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

“आम्ही एकत्र आलो तर 31 मुद्द्यांवर कॉमन मिनिमम प्रोग्रॅम होऊ शकतं. याबाबतची चर्चा सकारात्मक झाली तर पुढे जाणं योग्य ठरेल. नाहीतर ज्याप्रकारे इंडिया आघाडीत फूट पडली आहे तशी फूट महाविकास आघाडीत पडू नये, अशी चिंता आम्हाला आहे, अशी भूमिका आम्ही जाहीर केली आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. यावेळी प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या राजकीय ऑफरबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आमची ऑफर एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहे आणि तेवढ्यापुरताच मर्यादित आहे”, असं स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!