महाराष्ट्र ग्रामीण

बजेट आला… मोदी सरकारला प्रकाश आंबेडकर यांचे 3 सवाल; त्या मुद्दयावरूनही घेरलं

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प मांडला आहे. लोकसभा निवडणूक असल्याने मोदी सरकारचा या पाच वर्षाच्या काळातील हा शेवटचा बजेट आहे. या बजेटमध्ये कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. घरे बांधण्यापासून ते वीज मोफत देण्यापर्यंतच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. या बजेटवरून त्यांनी मोदी सरकारला तीन प्रश्न विचारून घेरलं आहे.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून मोदी सरकारला घेरलं आहे. हे सरकार केवळ ज्ञान देतंय. पण, भारतीय युवा, गरिब, महिला आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. वित्त मंत्र्यांनी केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आणि खोटे बोलण्यात धन्यता मानली आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच मोदी सरकारच्या काळात उद्योजक सोडून गेल्याच्या मुद्द्यावरूनही आंबेडकर यांनी घेरलं आहे.

आंबेडकर यांचे तीन सवाल कोणते?

१. जर अर्थव्यवस्था चांगली असेल, तर मागच्या 9 वर्षांत 12,88,293 अती श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजकांनी देश का सोडला? ”वायब्रंट गुजरात” मधील 7,25,000 लोकांनी बेकायदेशीर रित्या अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न का केला?

२. वास्तविक सरासरी उत्पन्नात 50% वाढ झाली या माहितीचा स्त्रोत काय?

३. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आणि दिलेली माहिती शंकास्पद आहे.

उद्धव ठाकरे यांची टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या बजेटवर टीका केली आहे. शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. गरीब, महिला, तरुण, शेतकरी या जातीसाठी काम करणार असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या हे धाडस त्यांनी केलं त्यांचे अभिनंदन. तुमच्या पंतप्रधानांच्या मित्रापलीकडेही देश आहे हे आता 10 वर्षानंतर कळले. महिलांबद्दल तुम्ही बोलताय मग सीतारामन जी तुम्ही मणिपूरकडे का जात नाहीत? बिलकीस बानूकडे जा? सांगा आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही शेतकऱ्यांना अतिरेकी समजत होतात आता त्यांच्याबद्दल बोलताय. हे सगळे जादूचे प्रयोग सुरु आहे. अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार आहे. आता महिलांना फुकट सिलेंडर देतील. तरुणांना नोकऱ्या देणार असे म्हटले मग 10 वर्ष काय केले?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

अंतरिम नव्हे अंतिम अर्थसंकल्प

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा अंतरिम नसून अंतिम अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे. देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा, करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प आज केंद्र सरकारने सादर केला आहे. विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने भारतीयांच्या माथी मारला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करून पुन्हा एकदा विकसित भारताचे दिवास्वप्न दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम नसून अंतिम असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!