‘अपने तो अपने होते हैं!’, घटस्फोटांच्या चर्चांना पूर्णविराम, ऐश्वर्याची अभिषेकच्या वाढदिवसी विशेष पोस्ट
मुंबई : पती-पत्नीच्या नात्यात मैत्री, प्रेम, समर्पण सारख्या अनेक गोष्टी असतात. पती-पत्नी यांच्यातली पार्टनरशीप ही सर्वात बेस्ट पार्टनरशीप मानली जाते. त्यामागे कारणही अगदी तसंच आहे. कारण संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांना आणि आई-वडिलांना, दोघांच्या कुटुंबाला सांभाळत प्रगती करत राहणं, सुख, दु:खात एकमेकांना सांभाळत यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाण्यासाठी दोघांना एकमेकांच्या आधाराची गरज असते. या मार्गावर जाणारे दाम्पत्य हे नेहमी यशस्वी होतात. बॉलिवूडमधील अशाच एका यशस्वी दाम्पत्याची सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा आहे. हे दाम्पत्य म्हणजे साधसुधं दाम्पत्य नाही. दोन्ही मोठे स्टार आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पती-पत्नींमध्ये मतभेद आणि मनभेद असल्याच्या चर्चा सुरु होत्या. काही सामाजिक ठिकाणी दोन्ही पती-पत्नी एकत्र जरी आले तरी ते एकमेकांकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण या सर्व बातम्यानंतर आता त्यांचं नातं किती घट्ट आणि समृद्ध आहे हे दर्शवणारी गोष्ट समोर आली आहे. आम्ही ज्या दाम्पत्याबद्दल बोलतोय ते दाम्पत्य म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. अभिषेकचा आज 48 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने ऐश्वर्याने आपल्या पतीला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या आपली मुलगी आराध्या आणि पती अभिषेक सोबत दिसत आहे. या फोटोसोबत ऐश्वर्याने गोड शब्दांमध्ये पती अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “आपल्याला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! देव आपल्याला खूप आनंद, प्रेम, शांती आणि चांगलं आरोग्यदायी आयुष्य देवो. चमकत राहा”, अशा शब्दांत ऐश्वर्या रायने आपल्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत.
चाहत्यांकडून उत्सफूर्त प्रतिक्रिया
ऐश्वर्या रायच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाबद्दल अफवा सुरु होत्या. ऐश्वर्याची ही पोस्ट या अफवांना सडेतोड उत्तर आहे, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. एकाने म्हटलं की, आम्ही याच पोस्टची वाट बघत होतो. तर एका चाहत्याने म्हटलं की, तुम्ही सर्वात आधी शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. तर काही चाहत्यांनी आराध्याचं कौतुक केलं आहे.
घटस्फोटाच्या चर्चांना आलेलं उधाण
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची केमिस्ट्री जेवढी रील लाईफमध्ये लोकांना आवडली तितकीच ती रीयल लाईफमध्येदेखील हीट ठरली आहे. त्यांनी लग्नाअगोदर अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केलं आहे. यामध्ये ढाई अक्षर प्रेम के, कुछ न कहो, गुरु यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. दोघांची सर्वात पहिली भेट ही 2000 साली झाली होती. ते एकमेकांच्या प्रेमात पडण्याआधी त्यांच्यात चांगली मैत्री होती. पुढे याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. त्यानंतर दोघांनी लगीनगाठ बांधली होती. पण गेल्या काही दिवासंपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर ऐश्वर्याने अभिषेकला सोशल मीडियावर वाढदिवासाच्या शुभेच्छांची पोस्ट केल्याने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.